श्रीराम मंदिराची वास्तू पूर्वाभिमुख आहे.प्रशस्त अशा दरवाज्यावर नगारखाना आहे.या दरवाजाच्या आत गेल्यावर बाजूंना देवडीवजा सोपा असून सभोवती तट असलेली मोकळी जागा आहे.दक्षिणेच्या कोपर्यातील सोपानमार्गाने वर गेल्यावर आपण मंदिराच्या प्राकारात येतो.प्राकाराचा सारा भाग सभामंडपाने व्यापलेला आहे.
इ.स.१९०१ मध्ये कै.केशवराव देशपांडे यांनी या सभामंडपाचा जीर्णोद्धार केला.सभामंडपाचा आवार बराच मोठा आहे.हे १४ मजबूत खांबांवर उभारलेले आहे.सभामंडपातच एका छोट्या दगडी घुमटित श्रीरामासमोर हनुमानाची पाषाणाची सुबक मूर्ती आहे.मारुतीराया हात जोडून उभा आहे.
सभामंडपानंतर लाकडी जाळ्यांनी पृथक केलेला पडवीवजा गाभारा आहे.त्यात एक छोटा देव्हारा आहे.आतल्या बाजूला देवाचा गाभारा आहे.एका दगडी चौथर्यावर राम,लक्ष्मण आणि सीतेच्या संगमरवरी मुर्त्या आहेत.त्या जयपूर पद्धतीच्या आहेत.
श्रीराम मंदिराच्या चारही बाजूला बर्यापैकी तट आहेत.सभामंडपाच्या सभोवार दक्षिण,उत्तर आणि पूर्वेला चांगले प्रशस्त सोपे होते.उत्तरेच्या सोप्यात स्वयंपाकाची जागा आणि दूसरी छोटी खोली आहे.बाकीचा सोप्याचा भाग कधी काळी पालखी,निशान किंवा इतर सामान ठेवण्यासाठी वापरत असत.मित्रमंडळ परिवाराने देवळाची चांगली काळजी घेतलेली आहे.
रामाच्या मंदिरात रामाला लागूनच श्रीनारायणस्वामींची समाधी आहे.